अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील भरवस गावाजवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण खात्याच्या पथकाने पीकअप वाहनातून १८ लाख ५७ हजार रूपयांचा गुटखा जप्त करून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, हवालदार नरेंद्र वारुळे, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील, पोलिस नाईक दीपक शिंदे यांच्या पथकाने सापळा रचला. त्यांना शुक्रवारी दुपारी संबंधीत वाहन येतांना दिसले.
पथकाने महिंद्रा बोलेरो पीकअप वाहनाचा (क्रमांक एम.एच.१८-बी.जी. ३७३८) पाठलाग करून भरवस गावाजवळ ते अडविले. यात १६ लाख रुपयांचा विमल गुटखा, २ लाख ५४ हजार रुपयांची व्ही १ तंबाखूची पाकिटे अशा ८० गोण्या आढळल्या. तर ७ लाख रुपयांचे वाहन, चालकाचा मोबाइल असा एकूण २५ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक अरुण पाटील व अरुण अमरलाल राजानी (रा. शिंदखेडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.