अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मुडी येथील शिक्षण संस्थेतल्या शिपायाच्या मृत्यू प्रकरणी अखेर संस्था चालकांसह ११ जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, अमळतेर तालुक्यातील मुडी येथील ग्रामशिक्षण मंडळाच्या सारबेटे येथील विद्यालयात तुषार भाऊराव देवरे (रा. सारबेटे) हे २०१३ साली अनुकंपा तत्वावर शिपाई या पदावर रूजू झाले होते. यानंतर त्यांची शिरूड येथील हायस्कूलमध्ये बदली करण्यात आली होती. ही बदली रद्द करण्यासाठी संस्थाचालकांकडून त्यांना १० लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. यात त्यांनी दोन लाख रूपये भरून देखील संस्थाचालकांनी पैशांचा तगादा लावला होता. याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. यात त्यांनी तीन चिठ्ठया लिहून यासाठी संचालक मंडळ जबाबदार असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, तुषार भाऊराव देवरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे प्र. अध्यक्ष पंजाबराव पांडुरंग पाटील, संचालक जयवंतराव अमृतराव पाटील (शिरुड), कमलाकर विनेश पाटील, दीपक चंदन पाटील, शालेय समिती सदस्य शशिकांत रघुनाथ पाटील, कर्मचारी दिनेश वसंत पाटील, निवृत्त मुख्याध्यापक अनिल लोटन पाटील, सचिन संजीव काटे, शरद दयाराम शिंदे, रमेश विनायक पाटील आणि सचिव सुनील पंढरीनाथ पाटील (नाशिक) यांच्या विरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.