अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मारवडसह परिसरातील गावांना वादळी पावसाचा मोठा फटका बसला असून यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वारा व पावसाने अमळनेर शहरासह ,धार, मारवड, कळमसरे, डांगरी, बोहरा, पाडळसरे, शहापूर, खेडी, वासरे, नीम, तांदळी चौबारी, जैतपीर आदी भागात जोरदार पाऊस व वादळी वारा सुटल्याने झाडे उन्मळून पडली आहेत. यात प्रामुख्याने मारवडसह परिसरात मोठे नुकसान झाले.
वादळी वार्यामुळे या परिसरात शेकडो झाडे उन्मळून पडल्याचे चित्र आहे. धार, मारवड रस्त्यावर बाभळीचे झाड आडवे पडल्याने सुमारे दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. मात्र ऐनवेळेस मारवड पोलीस कर्मचारी सुनील तेली तसेच हेडकोन्स्टेबल बागुल यांनी वाहतूक सुरळीत होण्याकामी मोलाची कामगिरी बजावली. योगेश पाटील व त्यांचे सहकारी यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्त्यावरील झाड बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी रस्त्यावर दुरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.बर्याच ठिकाणी घरांचे पत्रा उडाली तर निंभोरा येथे अरुण साहेबराव वाघ यांच्या राहत्या घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. या वादळी पावसात सुदैवाने जिवीतहानी टळली असली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
निंभोरा परिसरात गारपीट
अमळनेर तालुक्यातील निंभोरा, अंतुर्ली, रंजाणे, तासखेडा, आमोदे परिसरात वादळी वार्यासह गारपीट झाली. यामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गंगापुरी येथे घराचे पत्रा उडाल्याने घरातील संसारी वस्तूंचे नुकसान झाले आहे. वादळी वारा असल्याने यावेळी वीज पुरवठा खंडित झाला होता. उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी बांधवाचे मोठे नुकसान झाले आहे. गु्रांचा चारा पावसामूळे खराब झाल्याने,शेतकरी बांधव यांनी पंचनामा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या परिसरात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.