‘हिट वेव्ह’चा प्रकोप : महिलेचा उष्माघाताने मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या पारा चढलेला असतांना शहरातील एक विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील तापमान हे ४४ अंशांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेकांना त्रास होत असून अमळनेरातील एक महिलेस उष्माघातामुळे प्राण गमवावा लागला आहे. रुपाली गजेंद्रसिंग राजपूत वय ३३ असे मयत महिलेचे नाव असून सदर महिला अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेली होती दि ११ रोजी सायंकाळी ती रेल्वेने परत आल्यानंतर ऊन लागल्याने तिला अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या,यामुळे तिच्या पतीने तांबेपुरा येथेच एका खाजगी डॉक्टराना दाखवले असता त्यांनी उष्माघात असल्याचे सांगत गोळ्या औषधे देऊन प्राथमिक उपचार केले,थोडावेळ महिलेला बरेही वाटले मात्र सकाळी उठल्यानंतर पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने घरच्यांनी सकाळी १०.३० वाजता तात्काळ रिक्षा करून शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

अमळनेर ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी महिलेचे शवविच्छेदन केले.याबाबत अमळनेर पोलिसात महिलेचे दिर दीपक राजपुत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.सदर मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मयत महिलेच्या पश्चात पती,सासू सासरे,दिर असा परिवार असून गजेंद्र उर्फ अतुल मंगलसिंग राजपूत यांच्या त्या पत्नी तर मंगलसिंग राजपूत यांच्या मोठ्या सून होत्या. दरम्यान सदरची घटना लक्षात घेता भर उन्हात विवाह सोहळ्यास जाणे शक्यतोवर टाळाबे असा सल्ला वैद्यकीय अधिकार्‍यांनी देत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content