अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रातील भाविक आणि प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे तिरुपती-हिसार (खाटू श्याम) एक्सप्रेस ट्रेनला आता अमळनेर रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मिळाला आहे. अनेक महिन्यांच्या सतत पाठपुराव्यानंतर खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, आज या गाडीचा पहिला थांबा अमळनेर येथे झाला. यावेळी स्थानकावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या गाडीचे स्वागत करण्यात आले आणि गाडीला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

गाडीच्या या पहिल्या थांब्याच्या स्वागतासाठी अमळनेर रेल्वे स्थानकावर मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी डॉ. अनिल शिंदे, शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, ग्रामीण मंडल अध्यक्ष राहुल पाटील, लालचंद सैनानी, हरचंद लांडगे, नीरज अग्रवाल, श्याम पाटील, प्रीतपालसिंग बग्गा, सरचिटणीस भरतसिंह परदेशी, महेश पाटील, सुभाष मामा, महेश संदनशिव तसेच स्टेशन मास्टर अनिल जी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी एकत्र येत गाडीचे स्वागत करत, या ऐतिहासिक क्षणाची साक्ष दिली.

खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा थांबा मिळाल्याने अमळनेर शहर व परिसरातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. तिरुपतीकडे जाणारे यात्रेकरू आणि खाटू श्याम बाबाच्या दर्शनासाठी जाणारे भाविक यांना या थांब्यामुळे आता जवळच्या स्थानकावरूनच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वेळ, खर्च आणि प्रवासातील अडथळे टळणार आहेत. गाडीचा थांबा सुरू झाल्याच्या आनंदात अनेक भाविक आणि प्रवाशांनी खासदार स्मिताताई वाघ यांचे आभार मानले आणि या उपक्रमाचे स्वागत केले.
हा थांबा केवळ रेल्वे वेळापत्रकात एक बदल नसून, संपूर्ण अमळनेरकरांसाठी ही एक ऐतिहासिक आणि उपयुक्त सुविधा ठरली आहे. आता यात्रेकरूंना विशेषतः धार्मिक ठिकाणी जाणाऱ्यांना अधिक सुलभ आणि सोयीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. रेल्वे प्रशासन आणि जनप्रतिनिधींनी समन्वय साधून केलेल्या या कार्यामुळे स्थानिक जनतेत समाधानाचे वातावरण आहे.



