अट्टल दुचाकी चोरटा अटकेत

अमळनेर प्रतिनिधी | अनेक दुचाकींची चोरी करणार्‍याला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हवालदार सुनील हटकर व शिपाई राहुल पाटील हे गस्तीवर असतांना शनिवारी रात्री त्यांना एक जण संशयास्पदरित्या एमएच – १९, सीए – १३५१ या क्रमांकाच्या दुचाकीवरून जाताना दिसला. त्याला थांबवून त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नव्हते. तर त्याचा संपर्क क्रमांक व आधारकार्ड क्रमांक घेऊन त्याला त्यावेळी सोडण्यात आले.

यानंतर वाहन क्रमांक व इंजिनवरील क्रमांकावरून वाहन मालकास फोन लावला असता दोन दिवसांपूर्वी जळगाव येथील गोलाणी मार्केटजवळून ही दुचाकी चोरी गेल्याची माहिती समोर आली. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील खेमचंद तुकाराम पाटील यास या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. या दुचाकी चोरीबाबत स्थानिक पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले. या प्रकरणी खेमचंद पाटील याच्यावर कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. तपास सहायक फौजदार बापू साळुंखे करत आहेत.

दरम्यान, या बाबत खेमचंद पाटील याची सखोल चौकशी केली असता त्याने जळगावसह अमळनेर, धरणगाव, पुणे आदी शहरांमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!