बांभोरी येथील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातील माध्यमिक विद्यालय बांभोरी येथे २००४ आणि २००५ या दोन बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल २० वर्षांनी एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

या सोहळ्यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक वर्ग, मुख्याध्यापिका साधना लोखंडे, एल. पी. नन्नवरे, शिंपी सर, पटेल सर, आर. सी. कोळी सर, चौधरी सर, ए. व्ही. कोळी सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा यथोचित सत्कार करून आशीर्वाद घेतले.

यावेळी बोलताना शिक्षकांनी, आपल्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठे यश मिळवले आहे, हे पाहून अत्यंत आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील मूल्यांचे जतन करावे, असा सल्ला दिला. या स्नेहमेळाव्याचे आयोजन उमेश सुरेश बाविस्कर, योगेश अशोक ननवरे, रवी भागवत बाविस्कर, सुनील मोहन नन्नवरे, विजय पांडुरंग सोनवणे, हेमंत दिगंबर सपकाळे, मनोहर पंडित सपकाळे, रामचंद्र बाळु पाटील, किशोर अशोक पाटील, दिनेश धनसिंग नन्नवरे, सचिन गोरख शिरसाट, आणि समाधान सपकाळे या मित्रपरिवाराने केले होते. आयोजकांनी सर्व शिक्षकांचे आणि उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले.

या गेट-टुगेदरमध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय आठवणींचे व्हिडीओ आणि फोटो प्रदर्शित करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अनेक विद्यार्थी अनेक वर्षांनंतर भेटल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. हा स्नेहमेळावा केवळ आठवणींना उजाळा देणारा नसून, शाळा आणि विद्यार्थ्यांचे नाते अधिक दृढ करणारा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता भोजन आणि सामूहिक फोटोसेशनने झाली.