धरणगाव (प्रतिनिधी) येथील शिवसेना कार्यालयात मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत शिवसैनिकांनी भाजप उमेदवाराचा प्रचार न करण्याचा ठराव सर्वानुमते पारित केला आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढलीय. आधीच उमेदवार ठरत नसल्यामुळे भाजप कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तशात खाजगी कामासाठी मतदार संघाबाहेरील एका पदाधिकारीने थेट शिवसेना-भाजप युती धोक्यात घातल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत भाजपचा प्रचार न करण्याचा ठराव पारित झाल्यामुळे या घटनेला महत्व प्राप्त झाले आहे.
युती झाल्यानंतर भाजपच्या उमेदवारासाठी या मतदार संघात पोषक वातावरण निर्माण झाले होते. परंतु बाहेर गावातील काही पदाधिकारींच्या खाजगी वादामुळे जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेना-भाजप युतीला गालबोट लागले आहे. धरणगाव येथे मंगळवारी रात्री शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते राज्यमंत्री गुलाबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांचावर खोटे आरोप करत आहे. भाजपकडून युतीधर्म पाळला जात नाहीय. तसेच भाजपच्या खासदार हे मतदारसंघात फिरकलेच नाही, अशा विविध कारणांमुळे जळगाव लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवाराचा शिवसेना प्रचार करणार नसल्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. यावेळी शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील,प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे यांच्यासमोर रोष व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्त्यांचा रोष पाहून लोकसभा निवडणुकीत शिवसैनीक भारतीय जनता पक्षाचे काम करणार नसल्याच्या ठरावाला संमती दिली. या ठरावाला सूचक म्हणून शहर प्रमुख राजेंद्र महाजन तर अनुमोदन गटनेते पप्पू भावे यांनी केले. यावेळी शहरातील शिवसेनेचे नगरसेवक युवा सेना विद्यार्थी सेना अल्पसंख्याक सेनाचा पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला. दरम्यान, एकदा अशाच पद्धतीने शिवसेनेने असहकार्य केल्यामुळे भाजपला प्रभाव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे वसंतराव मोरे हे निवडून आले होते.