नाथाभाऊंचा आरोप साफ चुकीचा- आ. गिरीश महाजन ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । नाथाभाऊंनी त्यांचे तिकिट कापण्यासाठी माझ्यासह फडणवीस यांच्यावर केलेला आरोप साफ चुकीचा असल्याची प्रतिक्रिया आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे. या प्रकरणी पूर्ण चौकशी होऊन सत्य बाहेर यावे अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.

कालच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपले तिकिट कापण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला. पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीत या दोन्ही मान्यवरांनी आपल्या विरूध्द मत प्रकट केल्याची माहिती पक्षातील आपल्या एका मित्राने सांगितल्याचा संदर्भ त्यांनी यासाठी दिला होता. एवढेच नव्हे तर पक्षाकडे आपण याबाबत तक्रार केली असून यावर चौकशीदेखील करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावर आज जळगावातील पत्रकार परिषदेत माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांनी हे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, पक्षातील अनेक नेत्यांना तिकिटे नाकारण्यात आली. हा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असून त्यात माझा वा फडणवीस यांचा कोणताही रोल नव्हता. खडसे यांच्या घरात किमान तिकिट तरी मिळाले याकडे लक्ष वेधून त्यांनी नाथाभाऊंचा आरोप साफ चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी जर पक्ष चौकशी करत असेल तर त्यांनी अवश्य करावी अशी पुष्टीदेखील आ. गिरीश महाजन यांनी जोडली.

पहा आ. गिरीश महाजन नेमके काय म्हणालेत ते !

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/566636143915823

Protected Content