अज्ञात वाहनाची रिक्षेला धडक ; शालकासह मेहुण्याचा जागीच मृत्यू

 

पाचोरा, प्रतिनिधी  । शहराजवळच्या अंतुर्ली फाट्याजवळ  अज्ञात वाहनाने रिक्षेला दिलेल्या धडकेत शालक आणि मेहुण्याचाही जागीच मृत्यू झाला

 

पाचोरा शहरालगत अंतुर्ली फाट्या जवळ जळगांव – मनमाड हायवेच्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाजवळ पाचोऱ्याकडुन चाळीसगावकडे जाणाऱ्या पॅजो रिक्षाला मागावुन येवुन अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रिक्षा पलटी झाली. पलटी झालेल्या रिक्षाखाली दबुन शालकाचा व  मेहुण्याचा जागेवरच मृत्यू झाला.  हा अपघात  आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडला पाचोरा पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

डांभुर्णी ( ता. पाचोरा )  येथील शालकाच्या मुलीचे  चाळीसगाव येथे  बाळंतपण  झाल्याने तिला डांभुर्णी येथे रिक्षातुन सोडुन परत जात असतांना  हा अपघात घडला

डांभुर्णी  येथील छोटु भावसिंग परदेशी यांची मुलगी वडजी ( ता. भडगाव ) येथे दिलेली असुन तिचे बाळंतपण सात दिवसांपूर्वी झाले असल्याने चाळीसगाव येथे राहत असलेले मामा ईश्वर चुनीलाल बेनाडे (वय – ४५) हा दि. १२ रोजी सायंकाळी डांभुर्णी येथे पॅजो रिक्षा ( क्रं. एम. एच. १९ क्यु. ८१२३ ) मधुन सोडण्यासाठी आला होता.

 

दरम्यान छोटु परदेशी यांनी त्यांना मुक्कामी  थांबवून दुसऱ्या दिवशी जेवण करुन परत जा असा आग्रह धरला होता. मात्र त्याचेसोबत त्याचा दोंडवाडे  ( ता. जामनेर ) येथील पाहुणा नरसिंग भावसिंग परदेशी हा असल्याने त्यानेही दोंडवाडे येथे मुक्कामी येण्याचा आग्रह धरल्यानंतर ईश्वर बेनाडे हा डांभुर्णी येथे न थांबता दोंडवाडे येथे मुक्कामी गेला. दुसऱ्या दिवशी रविवारी जेवण आटपुन चाळीसगाव येथे रिक्षा घेऊन परत जात असतांना रिक्षात  गहू , दाळी, शेंगा असे साहित्य टाकुन नरसिंग परदेशी हाही रिक्षात बसून ईश्वर बेनाडेसोबत चाळीसगाव येथे जात असतांना अंतुर्लीफाट्या जवळील हायवेवरील पुलावर मागावुन वेगात येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षेला धडक दिली  अज्ञात वाहन चालक वाहन घेऊन पसार झाले.

 

पोलिसांच्या अंदाजानुसार अज्ञात वाहन पॅजो रिक्षापेक्षा मोठे असल्याने त्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने पॅजो रिक्षाचा चक्काचूर झाला. पॅजो रिक्षा जागेवरच पलटी झाल्याने रिक्षाखाली दबुन नरसिंग भावसिंग परदेशी (वय – ५५) व ईश्वर चुनीलाल बेनाडे (वय – ४५) यांचा जागेवर मृत्यू झाला. घटनेची खबर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांना मिळाल्याने त्यांनी तातडीने रुग्णवाहिका चालक निळकंठ पाटील यास घटनास्थळी पाठवुन पोलिसांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती कळविली.

 

घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, दत्तात्रय नलावडे, हवालदार हंसराज मोरे, अजय मालचे यांनी जावुन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे हे करीत आहे. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात डांभुर्णी, दोंडवाडे, चाळीसगाव व वडजी येथील नातेवाईकांनी येवुन एकाच वेळी शालक व मेहुण्याचा मृत्यू झाल्याने मोठा आक्रोश केला.

 

Protected Content