चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील ग्राम पंचायतीच्या कामांमध्ये झालेला गैरव्यवहार व अनियमितता तसेच १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना करण्यात केलेली मनमानी याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी येत्या २९ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा टाकळी ग्रा.पं.चे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रा.पं. सदस्य किसन जोर्वेकर यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याबाबत त्यांनी यापूर्वीही जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व नाशिक विभागीय आयुक्त व पं.स. गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. त्यावर कारवाई न झाल्याने आपण पुन्हा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती, तसेच आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यावेळी त्यांनी कारवाईचे लेखी आश्वासन देवून उपोषण न करण्याची विनंती केली होती. मात्र तरीही आजवर त्यासंदर्भात कारवाई न करण्यात आल्याने येत्या २९ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी या निवेदनातून दिला आहे.