चाळीसगाव, प्रतिनिधी | गिरणा धरणाच्या वरील भागात गेल्या दोन दिवसापासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गिरणा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. पिलखोड जामदा ऋषी पंथा येथील पुलावरून पाणी जाण्याची शक्यता प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी पूल ओलांडू नये असा इशारा देण्यात आला आहे.
गिरणा धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असल्याने आज दिनांक २ नोव्हेंबर रोजी गिरणा धरणातुन सोडण्यात येणारा पाणी प्रवाह हा ७०००० क्यु. वरून ७७५०० क्यु. करण्यात आला आहे. तर मन्याड धरण क्षेत्रातही पाण्याची वाढ झाल्याने मन्याड धरणाचा ओव्हर फ्लो ५५०० क्यु. ने चालू आहे. यामुळे गिरणा नदीपात्रात जवळपास ८५ ९०००० क्यु. पाणी प्रवाह सुरू असून यामुळे पिलखोड जामदा ऋषी पांथा येथील पुलांवरून पाणी जाण्याची शक्यता आहे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी व पुलावरून पाणी सुरू असताना विनाकारण ओलांडण्याचे धाडस करू नये तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशाराही प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.