कर्जमाफीवरून अजितदादांचा ‘यु-टर्न’ : म्हणाले ‘मी आश्वासन दिले नव्हते’ !


कोल्हापूर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “मी कुठे दिलंय कर्जमाफीचं आश्वासन ?” असे म्हणत विरोधी भूमिका घेतली आहे.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्र्यांकडे पत्रकारांनी शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाबाबत विचारणा केली असता त्यांनी सरळ शब्दांत उत्तर देत, “कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलं का? मी तरी दिलेलं नाही,” असे म्हटले. त्यांच्या या विधानामुळे महायुतीच्या घोषणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विरोधकांनी यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अजित पवारांच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, “शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. निवडणुकीआधी दिलेली आश्वासने विसरली जात आहेत,” असे म्हणत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आशा बाळगली होती. महायुती सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीच्या प्रक्रियेला चालना मिळेल, असे अनेकांना वाटत होते. परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे.

राज्याच्या अनेक भागांत शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची अपेक्षा अधिक तीव्र झाली होती. मात्र, सत्ताधाऱ्यांकडूनच अशा प्रकारची भूमिका घेतली गेल्यास शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे आगामी काळात या मुद्यावरून अधिक राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात झटकत स्पष्ट केले की त्यांनी असे कोणतेही आश्वासन दिले नव्हते. यामुळे महायुती सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाले असून शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या असंतोषाची भावना पुन्हा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.