Home राजकीय अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते : सुप्रीया सुळे

अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते : सुप्रीया सुळे


मुंबई-वृत्तसंस्था | एकीकडे राष्ट्रवादीतील फुटीबाबत संशयकल्लोळ सुरू असतांना पवार गटाच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी अजित पवार हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याचे सांगिल्याने नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

 

शिवसेनेत फुट पडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये झालेला टोकाचा संघर्ष हा राष्ट्रवादीतील फुटीनंतर झाला नाही. यामुळे शरद पवार यांच्या संमतीनेच अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याची चर्चा कधीपासूनच सुरू आहे. खुद्द शरद पवार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली असली तरी याबाबतचा संशयकल्लोळ अजून देखील सुरूच असतांना सुप्रीया सुळे यांच्या नव्या वक्तव्याने याला खतपाणी मिळाले आहे.

 

आज ‘अजित पवार यांचं पक्षातील सध्याचं स्टेटस काय ?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ”अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. आता त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतलेली आहे. त्याची तक्रार आम्ही महाराष्ट्र विधानसभेत अध्यक्षांकडे दिलेली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.


Protected Content

Play sound