मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे कधी काळी एकनिष्ट असलेले नेते सत्ताधारी पक्षात जात आहे. काही हरकत नाही. काट्याने काटा काढला जातो. या खेळाची सुरूवात त्यांनी केली आहे, आता हा खेळ आम्ही संपवू असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. अब की बार आघाडी 175 पार असा नारा देखील यावेळी पवार यांनी दिला आहे. काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि शिवसेनेचे शहापूरचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
‘भालके आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. ते सर्वांत आधी अपक्ष म्हणून निवडून आले होते. कालांतराने ते काँग्रेसमध्ये गेले. त्यांना विचारधारा पटली म्हणून आता ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. पांडुरंग बरोरा आणि त्यांचे वडील पवारसाहेबांचे कट्टर समर्थक. मात्र पांडुरंग यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरोडा यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते पांडुरंग यांच्या आधी आमदार झाले होते, असे पवार म्हणाले.
आघाडीची घोषणा २ ऑक्टोबरला होणार आहे. तीन वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल. काही मित्र पक्षांच्या जागांबाबत निर्णय घ्यायचा आहे. ते झाले की आघाडी जाहीर करू. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून साताऱ्याची जागा पक्षाकडे आहे. इथे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव काँग्रेसतर्फे चर्चेत आहे. ते लढले नाहीत तर आम्ही लढू. लवकरच उमेदवाराची घोषणा केली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जात आहे. त्यांना लढण्याचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्षाला कधीच कमकुवत समजत नाही. प्रत्येक उमेदवारांना आम्ही तुल्यबळ समजतो. कोणीही असूदे राष्ट्रवादी बारामतीची जागा दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आणणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.