नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून उपमुख्यंत्री अजित पवार यांनी काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यांच्या या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. या नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? या बाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीमधील जागावाटप, निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय रणनीती हवी? या बाबत अजित पवार आणि अमित शहा यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभेत बसलेल्या फटक्याची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा झाली, असल्याची माहिती सुत्रांनी दिली. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीच्या गोटात वेगवान हालचाली सुरू आहेत.