सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी (एक्सक्लुझीव्ह स्पेशल रिपोर्ट ) | मंत्री अनिल पाटील यांनी अजितदादा पवार गटाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला असून पहिल्याच फटक्यात सावदा येथून पक्षाला मोठे पाठबळ मिळाले असून माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्यासह बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे पाठबळ पक्षाच्या पाठीशी असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात दाखल झालेले ना. अनिल भाईदास पाटील यांनी आजपासून आपला जिल्हा दौरा सुरू केला आहे. यात त्यांनी आज रावेर येथील नुकसानग्रस्त शेतकर्यांची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. तेथे त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप देखील साधला. दरम्यान, सावदा येथून रावेरकडे जातांनाच माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आणि त्यांच्या सहकार्यांनी ना. अनिल पाटील यांचे जोरदार स्वागत केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून मंत्री अनिल पाटील रावेर येथे गेले. यानंतर परतीच्या प्रवासात ते राजेश वानखेडे यांच्या निवासस्थानी थांबले.
येथे ना. अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार मनीष जैन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, पक्षाचे माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भुसावळ येथील माजी नगरसेवक विजय मोतीराम चौधरी, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, त्यांच्या मातोश्री तथा माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे आदींसह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कुशल सुरेंद्र जावळे, युवक शहराध्यक्ष गौरव चंद्रकांत वानखेडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, सामाजिक न्याय आदींसह विविध सेलचे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य आदींनी ना. अनिल पाटील यांच्या उपस्थितीत अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश घेतला.
या सर्वांचे ना. अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा आपल्या गटाचाच असून जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा आपल्याला रावेर तालुक्यातून आणि विशेष करून सावद्यातून पाठबळ मिळाले असून याच प्रकारचा झंझावात जिल्ह्यात सुरू होणार असल्याचा आशावाद मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
सावदा येथील बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची जवळपास संपूर्ण कार्यकारिणीच अजितदादा पवार यांच्या गटात सहभागी झाल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी केले आहे. ना. अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पक्षाची स्थानिक पातळीवर प्रगतीशील वाटचाल राहणार असल्याची ग्वाही राजेश वानखेडे यांनी याप्रसंगी बोलतांना दिली.