मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर विविध पक्षाच्या नेत्यांनी शिंदे यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. याप्रसंगी तालिका अध्यक्ष आशीष शेलार यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव पारीत झाल्याचे जाहीर केले.
यानंतर विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची निवड झाल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या वाटचालीचा आढावा प्रस्तुत करत त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विधीमंडळात विरोधी पक्षनेता हे खूप मोठे आणि महत्वाचे पद असल्याने ते या पदाच्या लौकीकाला साजेसे काम करतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.