रावेर, प्रतिनिधी । आगामी येणारे सण हिंदू व मुस्लिम बांधवांनी गुण्या-गोविंद्याने साजरे करा, तसेच सोशल मिडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही व्हिडिओ, फोटो, ऑडीयो क्लिप व्हायरल करू नका, असे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले.
रावेर पोलीस स्टेशन येथे आगामी बकरी ईद, गोकुळाष्टमी, पोळा या सणांचे पार्श्वभूमी वर रावेर पोलीस स्टेशन तर्फे शांतता समिती बैठक आयोजन करण्यात आले होती. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, सर्व शांतता समिती सदस्यांनी देखिल शांतता कायम अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करून साध्या वेशातील पोलीस बनवून गावात शांतता ठेवावी. यावेळी बैठकीत अनेकांनी मनोगत व्यक्त करीत केले. यावेळी नागरीकांना शहरातील रस्त्यांबाबत तक्रारी केल्या तसेच रावेरात शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला जिल्हा नियोजन सदस्य पदमाकर महाजन, पोलिस निरीक्षक रामदास, वाकोडे उपनगराध्यक्ष असदउल्ला खान, नगरसेवक प्रल्हाद महाजन, शेख सादीक, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, माजी नगरसेवक अॅड. योगेश गजरे, दिलीप कांबळे, अशोक शिंदे, नितिन पाटील, शैलेंद्र अग्रवाल, डी.डी.वाणी, यूसुफ खान, गयास खान, शफी सर, असद मेंबर, सलिम शेख, नसीर खान, श्रीकांत भोकरीकर, अशोक गायकवाड, गयासुद्दीन काझी यांच्यासह हिंदु-मुस्लिम शांतता कमेटीचे सदस्य उपस्थित होते.