चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविदयालयातील मराठी विभागातर्फे खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतीदिनानिमित ‘अहिराणी भाषा दिनाचे’ आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व कै.शरच्चंद्रिका पाटील (माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच अहिराणी भाषेतील ग्रंथांचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
या कार्यक्रमाप्रसंगी कविवर्य विलास पाटील (प्रसिद्ध वात्रटिकाकार) मार्गदर्शन करतांना म्हणाले की, माझा या खान्देशात जन्म झाल्याने मी याच भूमीत घडल्याने अहिराणी ही माझ्या रक्तात भिनलेली भाषा आहे. साहित्यिकांनी तसेच सर्वसामान्य माणसांनी अहिराणीमध्ये संवाद साधल्यास अहिराणीचे संवर्धनात होण्यास मदत होईल. यावेळी त्यांनी “देखीसन तिरपं देखन गहरा खुश व्हयणु, जिंदगानी पेच से जिंदगानी खेत से, जिंदगानी मा परतेकाला ठेच शे, त्या दोनी राजा राणी गोरी गोरी पान, सरावन ना मयना बंद से ना इसड खानं, ती सांगसं मना कुकुसाठी इतला पथपाणी पायस, मी तेनसाठी गोड बोलनं टायस, त्यास्नी बॉम्बे ना मुंबई करतास, सावनाच रंग तुना पावसायी ढगावानी, नको चगारु वं असी नको करू खाणाखुणा, निंघता घर ना बाहर दिसू देना वं पदर, देख वं मीना येक वं जना चढावत नाय वं मनखनं जिना, अरे टक्कल टक्कल जसा चंद्र डोक्यावर अशा अनेक अहिराणी विनोदी कविता ऐकवून उपस्थितांना पोट धरून हसविले. त्यांनी शेवटी ‘मनी अहिराणी माय देखा दुधावरली साय’ या भाषेत अहिराणी भाषेचे केले. एम.टी.शिंदे यांनी मौखिक ओवी व अहिराणी साहित्याची भूमिका या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ‘अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं’ या अहिराणी गीताचे सादरीकरण केले.
अहिराणी देखील एक बोली भाषा
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक कविवर्य अशोक नीलकंठ सोनवणे (प्रसिद्ध खान्देश कवी) मार्गदर्शन करतांना म्हणाले की, बहिणाबाई यांनी मानवाला ‘तू माणूस कव्हा व्हसी’ असा मोठा प्रश्न विचारला आहे. त्यांच्या गीतातील तत्व जाणून घेणे तितकेच महत्वाचे ठरेल. मराठीतील अनेक बोलींपैकी अहिराणी ही एक बोली आहे.
अहिराणी बोलणारा अडाणी नसतो
डॉ.बापूराव देसाई, डॉ.रमेश सूर्यवंशी, रमेश आहेर या खान्देशी साहित्यिकांनी अहिराणी भाषेच्या संवर्धनास हातभार लावला आहे. त्याचप्रमाणे डॉ.सरोजिनी बाबर यांनी देखील अहिराणी लोकसाहित्याचे संकलन करून या अहिराणी भाषेच्या श्रीमंतीत आणखी महत्वपूर्ण भर टाकली आहे. आज अनेक अहिराणी साहित्यिक वृत्तपत्रांमधून सदर लेखनातून अहिराणी भाषा जोपासत आहेत ही महत्वाची गोष्ट आहे. आज अहिराणी भाषिकांनी आपल्या भाषेत संवाद साधणे तितकेच महत्वाचे आहे. अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी लेखन, वाचन व त्या भाषेत संवाद साधणे काळाची गरज आहे. अहिराणी लोकसाहित्यातील गर्भितार्थ समजून घेतल्यास या भाषेचे सौंदर्य अधिक वाढेल यात शंका नाही. अहिराणी बोलणारा अडाणी असा जो गैरसमज आहे तो आपण दूर सारून संवाद साधला तरच अहिराणी भाषेचे संवर्धन होण्यास मदत होईल. यावेळी त्यांनी त्यांच्या स्वलिखीत व प्रकाशित झालेल्या “देखा आमना गावमा” या विनोदी सदराचे सादरीकरण केले.
यावेळी अध्यक्षीय भाषण करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, सर्व भाषांमध्ये मराठी तसेच अहिराणी भाषा सुंदर आहेत. अहिराणी भाषा ही सर्व बोली भाषांना सामावून घेणारी असल्याने तिच्या सुंदरतेत अधिक भर पडली आहे. या भाषेचे संवर्धन ही आपली जबाबदारी असल्याने या भाषेत जितका संवाद साधला तितकी ती श्रीमंत होईल.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाच्याप्रसंगी संगीत विभाग प्रमुख किशोर खंडागळे व विभागातील विद्यार्थ्यांनी अहिराणी स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक कविवर्य अशोक सोनवणे (प्रसिद्ध खान्देश कवी), कविवर्य विलास पाटील (प्रसिद्ध वात्रटिकाकार), महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य बी.एस.हळपे, एम.टी.शिंदे, पर्यवेक्षक व्ही.वाय.पाटील, पी.एल.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.एल.पाटील यांनी अहिराणी भाषेतून केले.
कार्यक्रमासाठी यांनी केले प्ररिश्रम
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ए.बी.सूर्यवंशी यांनी केले तर आभार एन.बी.शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम.एल.भुसारे, डॉ.एस.ए.वाघ, डी.एस.पाटील, डी.डी.कर्दपवार, डॉ.आर.आर.पाटील, मुकेश पाटील, शाहीन पठाण, किशोर खंडागळे, प्रदीप बाविस्कर, प्रताप सोनवणे, भरत भालेराव यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.