भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया तस्करीच्या माध्यमातून काळाबाजारात विकण्यासाठी निघालेल्या ट्रकचा कृषी खात्याच्या भरारी पथकाने थरारक पाठलाग करत हा डाव उधळून लावला असून याबाबत रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात कृषी खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव येथील “स्वामी ॲग्रो” या कृषी सेवा केंद्राचा चालक राकेश पाटील याने कोणताही वैध परवाना नसताना २५ मेट्रिक टन युरिया खत नाशिक जिल्ह्यातील एका कृषी सेवा केंद्राकडे बेकायदेशीररीत्या रवाना केल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक सुभाष काटकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाकडून तातडीची कारवाई राबविण्यात आली.
भरारी पथकाचे अध्यक्ष पद्मनाभ म्हस्के ,कृषी विकास अधिकारी, तसेच विकास बोरसे (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक), दिगंबर तांबे (तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, भडगाव), निखील टोळकर (तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, पारोळा) व रामचंद्र पाटील (तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, पाचोरा) यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून भडगाव–कजगाव–चाळीसगाव–हीरापूर या मार्गावर धावता पाठलाग करत MH-41 AG-4041 या क्रमांकाचा ट्रक पकडला.
ट्रकमधील संपूर्ण २५ टन युरिया खत जप्त करून ट्रकसह माल भडगाव पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या प्रकरणी खत (नियंत्रण) आदेश, १९८५ तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत युरिया खताच्या काळ्या बाजारात विक्री व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने रात्री १२.०० ते १२.३० दरम्यान फिर्याद दाखल करत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर होती .
दरम्यान, शेतकऱ्यांचा युरिया काळ्या बाजारात वळवणाऱ्यांवर कृषी विभागाची नजर असून, यापुढेही अशा घटकांवर कडक व निर्भीड कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.



