‘माफी माग-माफी माग….मंगेश चव्हाण माफी माग’ने दणाणले चाळीसगाव ! ( व्हिडीओ )

चाळीसगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्र्यांविरूध्द अपशब्दाचा वापर करणारे मंगेश चव्हाण यांच्या विरोधात आता शिवसेनेच्या जोडीला काँग्रेस व राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीतील घटक पक्षदेखील सरसावल्याचे दिसून आले आहे. आज आघाडीतर्फे शहरात जोडे मार आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करत मंगेश चव्हाण यांचा निषेध करण्यात आला.

दुधाला जादा दर मिळावा यासाठी महायुतीच्या वतीने दि १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. चाळीसगावी देखील आंदोलन झाले या आंदोलनात खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण देखील सहभागी झाले होते. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांचा तोल गेला व उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्यांनी अपशब्दाचा वापर केल्याने खळबळ उडाली आहे. याचे पडसाद राज्यभर उमटले असून अनेक शिवसैनिकांनी त्यांना मोबाईल वर कॉल करून याचा जाब विचारत निषेध केला आहे. तर आता शिवसेनेच्या मदतीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे घटकपक्षदेखील आले आहेत. महाविकास आघाडीतर्फे आज शहरात आयोजित जोडेमार आंदोलनात एकजुटीने आमदारांचा निषेध करण्यात आला.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस च्या वतीने या घटनेचा निषेध करून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यानंतर तहसीलदार व पोलिस निरीक्षक चाळीसगाव यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यात आमदार मंगेश रमेश चव्हाण यांचेवर शिवसेना तालुका प्रमूख रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन करण्यात आले. तसेच याप्रसंगी माफी माग…माफी माग…मंगेश चव्हाण माफी माग ! ही घोषणा लक्षवेधी ठरली.

या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा उपप्रमुख आर. एल. पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, काँग्रेस प्रादेशिक कमिटी सदस्य अशोक खलाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, जि.प. सदस्य शशीकांत साळुंके, माजी आमदार ईश्‍वर जाधव, देवेंद्र पाटील, श्याम देशमुख, भगवान बापू पाटील प्रदीप देवराम देशमुख, अशोक खलाणे धनंजय चव्हाण, शेखर देशमुख, भैय्या साहेब पाटील, योगेश राजधर पाटील, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख प्रतिभा पवार, जळगाव शिवसेना माहिला आघाडी नेत्या मनीषा पाटील, महिला आघाडी उपतालुका प्रमुख सविता कुमावत, सुनंदा काटे, मंदा काटे, शैलेंद्र सातपुते, तुकाराम महाराज, अण्णा पाटील, पत्रकार आर. डी. चौधरी, दिनेश घोरपडे, आकाश शेळके, मोहन चव्हाण, पवन चव्हाण, गौरव घोरपडे, रघुनाथ कोळी, रामेश्‍वर चौधरी, निलेश गायके, पुंडलिक कुमावत, जितेंद्र बोंदार्डे, गणेश भवर, रमेश भवर, हरिभाऊ घाडगे, संजय ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या आंदोलनात हजर राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी मोबाईल वरून या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

खालील व्हिडीओत पहा आंदोलनाची चलचित्रे !

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/680394256021183

Protected Content