नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने नुकत्याच संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला होणारे विरोधाचे लोण आता दिल्लीतही पोहचले असून येथे मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आल्याने आज शाळांना सुटी देण्यात आली आहे.
दक्षिण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रविवारी सायंकाळी काढलेल्या मोर्चादरम्यान काही समाजकंटकांनी दिल्ली पर्यटन महामंडळाच्या बससह तीन बस, काही मोटारी आणि अनेक दुचाकी पेटवल्या. दिल्लीतील जंतरमंतर भागात पोहोचण्यापूर्वीच दक्षिण दिल्लीतील मथुरा मार्ग परिसरात त्याला हिंसाचाराचे गालबोट लागले. या भागातील वाहने पेटवून देण्यात आली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून लाठीमार केला. यापैकी काही आंदोलक जवळच्याच इस्लामिया विद्यापीठात शिरल्याचे समजताच पोलिसांनी तेथे मोर्चा वळवला व तेथून काही आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव आज, सोमवारी दिल्लीतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे आसामसह पश्चिम बंगालच्या नाडिया, वीरभूम, उत्तर २४ परगणा आणि हावडा जिल्ह्यांमध्ये वातावरण अजूनही तणावग्रस्त असून तेथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.