नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसल्याने भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरु झाली आहे.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकल्याचे पाकिस्तानकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विट करून याबाबतचा दावा केला आहे. पाकिस्तानी हवाई दलाने पाकिस्तानी तळावरून उड्डाण घेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करून हल्ला केल्याचे प्रवक्ते डॉ. महंमद फैजल यांनी म्हटले आहे. ही विमाने भारताच्या हद्दीत तीन किलोमीटरपर्यंत घुसली होती.
या हल्ल्यानंतर जम्मू, श्रीनगर, अमृतसर, पठाणकोट, चंदिगड, डेहराडून, लडाख ही विमानतळे बंद करण्यात आली आहेत. पाकिस्तानचे एक विमान आपण पाडल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या निवासस्थानी बैठक सुरु झाली आहे. तिन्ही दलाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच काही मंत्रीही या बैठकीत उपस्थित आहेत. आता भारत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.