भुसावळ, प्रतिनिधी | येथील बसस्थानकाबाहेर अवैध रिक्षा चालकांची दादागिरीच्या घटना वाढत असून आज (दि.५) दुपारी बस स्थानकातून एक बस वरणगाव फॅक्टरीकडे जाण्यासाठी बाहेर आली असता बससमोर एकाने आपली रिक्षा उभी करून वाहन चालक आर.एस.पाटील यांना अडथळा निर्माण केला. रिक्षा चालकास वाहन बाजूला घेण्यासाठी सांगितले असता त्याने बस चालकास तोंडावर बुक्यांनी मारहाण करून जखमी केले.
बस चालकास उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून रिक्षा चालक फरार झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ स्थानकात सर्व चालकांनी बस थांबवून आरोपीस अटक केल्याशिवाय कुठलीही बस सुरू होणार नसल्याचा इशारा दिला. त्यानंतर दोन ते तीन तासानी पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोउनि सारिका कोळपकर, वाहतूक निरीक्षक काशिनाथ सुरळकर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी मॅनेजर व वाहन चालकांशी चर्चा केली. आरोपीविरुद्ध कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बस सेवा पूर्ववत पुन्हा सुरू करण्यात झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक चौधरी यांनी दिली आहे.
या घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आणि आंदोलनामुळे येथून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले.