पहूर, ता . जामनेर प्रतिनिधी । कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या साडे पाच महिन्यांपासून बंद असलेला बाजार पट्ट्यातील आठवडे बाजार आज रविवारी भरला आहे. या आठवडे बाजारात पहूर परिसरातील खेड्या-पाड्या वरील ग्राहकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. या आठवडे बाजारात मात्र विना मास्क फिरणाऱ्याची संख्या लक्षणीय होती. पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरात गेल्या साडे पाच महिन्यांपासून आठवडे बाजारात बाजार भरत नव्हता. त्यामुळे विक्रेते आपली दुकानं बस स्टँड परिसरात व लेले नगर भागात तसेंच पहूर पेठ गावातही लावत होते. यामुळे बसस्थानक परिसरात आणि लेले नगर भागात व पहूर पेठ गावात रहदारीचा प्रश्न निर्माण होत होता. पहूर हे बाजारपेठेचे गाव असल्यामुळे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील ग्राहक आणि विक्रेते आठवडे बाजारात मोठ्या संख्येने येतात. साडे पाच महिन्यानंतर बाजार भरल्यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली, यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे पाहायाला मिळाले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने काळजी घेवून, सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन पोलीस व्हॅनच्या माध्यमातून करण्यात आले.
करोना विषाणू संक्रमणाचे भय जनतेच्या मनातून हळूहळू कमी होत आहे. तरीही कोरोनाचा कहर मात्र सुरूच आहे. पहूर गावात कोरोना बाधितांच्या संख्येचे द्विशतक पूर्ण केले असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मात्र वाढत आहे. काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.