नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. ३० मे रोजी मतदानपूर्व आचारसंहिता घोषित होईल. आचारसंहितेची घोषणा होताच पंतप्रधान मोदी ३० मे ते १ जूनपर्यंत कन्याकुमारीला भेट देऊन ध्यानधारणा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी दोन दिवस ध्यानधारणा करणार आहेत. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनीही ध्यानधारणा केली होती. .
लोकसभेच्या सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी ५७ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. ३० मे रोजीच पंतप्रधान मोदींची पंजाबमध्ये जाहीर सभा होत आहे. ही सभा झाल्यानंतर ते तमिळनाडूच्या दौऱ्यावर रवाना होतील. तिथून ते ३१ मे रोजी विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देऊन दोन दिवस ध्यानधारणा करतील, असे सांगितले जात आहे. या दौऱ्याचा अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियल येथे ध्यान केल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी भारतासाठीचे आपले विचार व्यक्त केले होते. या जागेचा स्वामी विवेकानंद यांच्यावर फार प्रभाव पडला होता. ज्याप्रकारे सारनाथी भूमी गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाचा दुवा मानली जाते, त्याचप्रकारे कन्याकुमारीतील टेकड्यांचे विवेकानंद यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. देशभरात प्रवास केल्यानंतर स्वामी विवेकानंद याठिकाणी आले होते, त्यांनी तीन दिवस याठिकाणी ध्यान केले होते.