पुरेशी लस नसल्याने मृत्यू वाढले ; मनीष शिसोदियांचा मोदी सरकारवर आरोप

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात लशींची निर्मिती होऊनही नागरिकांना लस मिळत नसल्याने मृत्यू दर वाढल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मोदी सरकारवर केला आहे

 

देशातील कोरोना रुग्ण वाढीसोबतच मृत्यूंचा आकडाही नकोसा विक्रम प्रस्थापित करत आहे. रुग्णालयात अपुरी वैद्यकीय उपकरणं, बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या गंभीर स्थितीसाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे.

 

“९३ देशांमध्ये  तीन महिन्यात साडे सहा कोटी लशींचा पुरवठा करण्यात आला. ९३ पैकी ६० देशात कोरोना  आटोक्यात आहे. ८८ देशांमध्ये मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र आपल्या देशात मार्चपासून १ लाखाहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र आम्ही अन्य देशांना लशींची निर्यात करतो”, असा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.

 

 

 

 

‘देशात लस देण्याचा विचार केला नाही. लसीसाठी ऑनलाइन अपॉईंटमेंट घेण्यासाठी लोक २४ तास कम्प्युटर आणि मोबाईलवर बसून असतात. केंद्र सरकार आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी आपल्या लोकांना मृत्यूच्या दाढेत टाकणं एक मोठा गुन्हा आहे. आंतराष्ट्रीय मदतीच्या नावावर कोणत्या देशाने दुसऱ्या देशांना लशींची निर्यात केली’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. “दिल्लीत तरुणांना फक्त साडे पाच लाख लशी दिल्या गेल्या. आमच्या तरुणांच्या जीवाची किंमत आहे की नाही”, असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

 

 

 

दुसऱ्या लाटेत तरुणांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आतातरी डोळे उघडून देशाला प्राथमिकता द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

Protected Content