जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अॅॅड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, जळगाव येथे ‘ग्रंथालय’ आणि ‘मराठी विभागा’च्या वतीने आज शनिवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.
यावेळी ‘मराठी विभागा’च्या वतीने ‘चला वाचूया; स्वतःला घडवूया’ या विषयावर ग्रंथपाल प्रा. टी.एस.पाटील यांचं व्याख्यान संपन्न झालं. या व्याख्यानात त्यांनी वाचण्यासाठी असलेले विविध विषय, जीवनात वाचनाचे महत्त्व आणि वाचनाने आपल्यावर घडत असलेले संस्कार याविषयी माहिती सांगितली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारासह आपल्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असलेलं वाचन, वाचन संस्कृतीचं महत्त्व याविषयी विविध ग्रंथाचे दाखले देत माहिती सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
यावेळी मराठी विभागाच्या प्रा. रेणुका झांबरे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर प्रा. मोरेश्वर सोनार यांनी आभार मानलं. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
‘वाचन प्रेरणा दिना’च्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. यासाठी ग्रंथालय विभागाच्या वतीने सामाजिक, राजकीय, साहित्य, सांस्कृतिक यासह ग्रंथालयातील विविध विषयावरील पुस्तकं, मासिक आणि वर्तमान पत्रांचं सामूहिक वाचन करण्यात आले.