पित्याचे छत्र हरविलेल्या मुलांना काकांचा आधार

d40b8325 ab76 4706 8da6 1fc6257beda6

 

यावल (प्रतिनिधी) चार वर्षांचा मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा अशा भावंडांच्या पित्याचे अचानक निधन झाल्याने पोरके झालेल्या या दोघांना त्यांच्या काकांनी आधार देवून आपले वारस म्हणून स्विकारले आहे. त्यासाठी दत्तक विधान कार्यक्रम देखिल घेण्यात येवून कायद्यानुसार दत्तकपत्र तयार केले आहे. बालकांना काकांचा आधार मिळाल्याने त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुकर होण्यास मदत होणार आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील हिंगोणे येथिल रहिवासी कैलास गोपाल गाजरे यांचे २०१७ मध्ये निधन झाले. तेव्हा त्यांची मुलगी ईश्‍वरी व मुलगा तुषार यांचे पितृछत्र हरविले. याच दरम्यान, त्यांची आई सपना कैलास गाजरे यांना या दोन्ही मुलांचे पालन पोषण करुन सांभाळ करणे शक्य होत नव्हते. अशातच मुलांचे काका गुणवंत गोपाळ गाजरे व दिपाली गुणवंत गाजरे यांना दुर्दैवाने कोणतेही अपत्य नसल्याने आयुष्यात कुणाचातरी सहारा व अपत्य प्रेम मिळावे या हेतूने त्यांनी आपल्याच भावाच्या दोन्ही मुलांना दत्तक घेण्याचे ठरविले. त्यानुसार, मुलांच्या आईशी चर्चा करण्यात आली.त्यांनी संमती दिल्याने दत्तक घेण्यासंदर्भात गुणवंत गाजरे व दिपाली गाजरे यांनी निर्णय घेतला. त्यानुसार बुधवार दि.१५ रोजी पुरोहित प्रविण जोशी यांनी पौराहित्य करुन शास्त्रोक्त विधी प्रमाणे दत्तक विधानाचा कार्यक्रम पार पाडला.

 

मुलगी ईश्‍वरी ही चार वर्ष वयाची असून मुलगा तुषार हा तीन वर्ष वयाचा आहे. आपल्याच काका- काकुंचा आधार आई-वडिल म्हणुन लाभणार असल्याने या मुलांचे भविष्य सुखकर होण्यास मदत होणार आहे. दत्तक विधान कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी गुरुवार दि. १६ रोजी सावदा ता. रावेर येथे कायद्यानुसार दत्तक पत्र दुय्यम निबंधक कार्यालयात एक हजार रुपयांच्या स्टँपवर तयार करण्यात आले. त्यात मुलांची आई सपना गाजरे यांनी दत्तक वडिल गुणवंत गाजरे व दत्तक आई दिपाली गाजरे यांना आपली दोन्ही मुले दत्तक दिल्याचे लिहून दिले आहे. व त्यांनी सुद्धा लिहुन घेतले आहे. त्याच प्रमाणे यासाठी साक्षीदार म्हणुन सावदा येथील वसंत पुरुषोत्तम होले व हिंगोणा येथील किसन तुकाराम बोरोले यांच्या स्वाक्षर्‍या आहे. पित्याचे छत्र हरविलेल्या मुलांना आपल्याच काकांनी आधार दिल्यामुळे मुलांना परकेपणा न वाटता आपल्याच घरात ते मनमोकळेपणे आनंदी राहु शकणार आहे. मुलांच्या पालनपोषण व सांभाळण्याची जबाबदारी घेतलेल्या गुणवंत गाजरे व सौ. दिपाली गाजरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Add Comment

Protected Content