Jalgaon जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दूध संघात प्रशासक मंडळाला ताबा देण्यावरून संचालक मंडळाने आज आपल्याला १९ ऑगस्टपर्यंत कारभार सांभाळण्याची परवानगी दिल्याचा दावा केला असला तरी सहकार खात्याच्या विभागीय उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार दुध संघावर आता प्रशासक मंडळाचाच ताबा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहचला आहे. २८ जुलै रोजी राज्य सरकारने जळगाव जिल्हा दूध संघाची विद्यमान कार्यकारीणी कार्यकारीणी बरखास्त करून यावर मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केली होती. यासोबत प्रशासक मंडळात आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख, ओबीसी सेलचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय भोळे, अमोल चिमणराव पाटील, राजेंद्र वाडीलाल राठोड, अशोक कांडेलकर, अमोल शिंदे, गजानन पाटील आणि विकास पंडित पाटील यांचा समावेश होता. यानंतर दुसर्याच दिवशी म्हणजे २९ जुलै रोजी रात्री उशीरा चार प्रशासकांनी दूध संघाच्या एमडी कडून प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारली होती. तर याच्या विरोधात विद्यमान संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाने काल अर्थात १ ऑगस्ट रोजी या प्रकरणी निर्णय देऊन ‘जैसे थे’ असा आदेश दिला होता. याचवेळी प्रशासकीय मंडळाने धोरणात्मक निर्णय घेऊ नये असा निर्णय देखील न्यायालयाने दिला होता. यामुळे प्रशासक मंडळाने आपल्याला दिलासा मिळाल्याचे म्हटले होते. यानंतर आज मंदाताई खडसे यांनी आपल्या सहकारी संचालकांसह दूध संघ गाठून आपणच १९ ऑगस्ट पर्यंत जिल्हा दूध संघाचे संचालक असतील असा दावा त्यांनी केला. यामुळे दूध संघावर नेमके कोणाचे नियंत्रण असेल याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमिवर, लागलीच मुख्य प्रशासक आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा दूध संघावर प्रशासक मंडळाचाच ताबा असल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात त्यांनी काल उच्च न्यायालयाने काल दिलेल्या निर्देशानुसार विभागीय सहकार उपनिबंधक (दुग्ध) यांनी आज जारी केलेले पत्र सादर केले. या पत्रामध्ये दूध संघाचे कार्यकारी संचालक हे प्रशासकीय प्रमुख असून त्यांच्या ताब्यात संस्थेचे दप्तर आणि इतर मालमत्ता असल्याने त्यांनी कलम-७७ अन्वये प्रशासकीय मंडळाला दिलेला ताबा हा वैध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे प्रशासक मंडळाने दूध संघाच्या प्रशासकीय समितीच्या सहकार्याने कारभार पहावा, आणि स्थिती जैसे थे ठेवावी असे या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. या आदेशावर विभागीय सहकार उपनिबंधक (दूग्ध ) सुरेंद्र तांबे यांची स्वाक्षरी आहे. यामुळे जिल्हा दूध संघावर प्रशासक मंडळाचाच ताबा असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.