


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून अंतिम प्रशासक नेमणुकीचे अधिकृत आदेश प्राप्त झाले असून, यावल तालुक्यातील तब्बल ४६ ग्रामपंचायतींवर पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पुन्हा एकदा प्रशासक राज लागू करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यामुळे व तातडीने निवडणुका होऊ न शकल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेच कारभार सोपवण्यात आला आहे. मात्र, प्रशासकीय कारभारामुळे ग्रामीण भागातील विकासकामे, नागरी सुविधा आणि स्थानिक प्रश्न रखडून पूर्णपणे ‘ऑक्सिजनवर’ जातील, अशी तीव्र चिंता आणि प्रतिक्रिया यावल तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद जळगाव ग्रामपंचायत विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार (जा.क्र. ग्रापं/०१/ आरआर/१०१३/२०२६ दिनांक ०८/०९/२०२६), मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा ३) च्या कलम १५१ अन्वये, प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेणे शक्य नसल्यास राज्य शासनाने दिलेले अधिकार वापरत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांवर ही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली असून, ही नियुक्ती ६ महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहील.
या आदेशान्वये तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींचा कारभार विविध अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. विस्तार अधिकारी (ग्रा.पं) एस. बी. भदाणे यांच्याकडे आडगावसह आमोदे, चिंचोली आणि उटखेडा या ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. तर के. सी. सपकाळे यांच्याकडे तब्बल ५ ग्रामपंचायतींचा (बामणोद, भालोद, बोरखेडा बु., मारूळ, नायगाव) कार्यभार सोपवण्यात आला आहे. एन. बी. वैराळकर यांच्याकडे वडोदे प्र. सावदा, विरोदा, सांगवी बु. आणि वनोली या ४ गावांचा पदभार राहील. कृषी विस्तार अधिकारी रमेश विश्वाळे यांच्याकडे वडोदे प्र. यावल, विरावली, किनगाव बु. आणि डांभुर्णी या गावांची धुरा देण्यात आली आहे.
तसेच कृषी विस्तार अधिकारी जी. टी. सोनवणे यांच्याकडे दुसखेडा, हंबर्डी, राजोरा आणि सांगवी खुर्द या ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणून काम पाहतील. सार्वजनिक बांधकाम अभियंता गणेश ठाकूर यांच्याकडे टाकरखेडा, हिंगोणे व डोंगर कठोरा तर कृषी विस्तार अधिकारी ई. के. चौधरी यांच्याकडे कासवे, कोसगाव आणि अंजाळे ग्रामपंचायतीचा पदभार देण्यात आला आहे. याशिवाय महिला व बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षिका अर्चना राजेंद्र आटोळे यांच्याकडे सातोद व कोळवद, आरती इंगळे यांच्याकडे अट्रावल, डी. जी. निळे यांच्याकडे बोरखेडा खुर्द, तर केंद्र प्रमुख मोहम्मद हबीब तडवी यांच्याकडे कोरपावली ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. एकाच अधिकाऱ्याकडे अनेक गावांचा पदभार असल्याने ग्रामस्थांचे मूलभूत प्रश्न सुटणार की अधिकच जटील होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.



