अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील बोरसे गल्लीत मंगळवारी २१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. आधार संस्थेकडे या विवाहाची माहिती मिळताच तातडीने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलिस निरीक्षक, आणि अमळनेर तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेवून ही कारवाई केली आहे.
या कारवाईत नायब तहसीलदार प्रशांत धमके, पोलीस निरीक्षक पिंगळे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, संरक्षण अधिकारी योगिता चौधरी, आणि आधार संस्थेचे प्रतिनिधी ज्ञानेश्वरी पाटील यांनी बोरसे गल्ली परिसरात पोहोचून विवाह थांबवला. संबंधित मुलीचे आधार कार्ड तपासून तिचा जन्म २ जानेवारी २००८ असल्याचे स्पष्ट झाले. मुलगी अल्पवयीन असल्याने, हा विवाह थांबवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी विवाहासंबंधित जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, उपविभागीय दंडाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.