सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या कुंभारखेडा गावात यावर्षी भव्यदिव्य ‘आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताह’ पार पडणार असून, यावल व रावेर तालुक्याच्या वतीने हा महोत्सव ऐतिहासिक उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या आठवडाभर चालणाऱ्या धार्मिक-सांस्कृतिक महोत्सवात युवक-युवतींसाठी प्रथमच ‘ज्ञानेश्वरी चिंतन’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज यांनी याबाबत माहिती देताना हा उपक्रम युवकांना अध्यात्माशी जोडणारा ठरेल, असे सांगितले.
या महोत्सवासाठी कुंभारखेडा या रमणीय गावाची निवड करण्यात आली असून 16 मार्च ते 24 मार्च दरम्यान हजारोंच्या संख्येने भाविक, वारकरी, विद्यार्थी तसेच सातपुड्यातील आदिवासी बांधवांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. यावल-रावेर तालुका सकल हिंदू समाजाने मुक्ताई संस्थान मुक्ताईनगरच्या फिरत्या नारळी सप्ताहाचे यजमानत्व स्वीकारताच तयारीचा पहिला मोठा टप्पा म्हणून कामसिद्ध मंदिर, रोझोदा येथे भव्य नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. सभागृहात महाराज मंडळी, लोकप्रतिनिधी आणि भाविक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

बैठकीची सुरुवात डिंगंबर महाराज चिनावलकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी युवकांना अध्यात्मिक विचारांची गरज, सप्ताहाचा हेतू व सविस्तर आखणी यावर भाष्य केले. मुक्ताई संस्थानच्या पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे यांनी फिरत्या सप्ताहाच्या स्वरूपावर आणि आवश्यक नियोजनावर मार्गदर्शन केले. सप्ताहाच्या आयोजनासाठी सुमारे 20 एकर क्षेत्र निश्चित झाले असून, संपूर्ण परिसरात भव्य दिव्य सुविधा उभारल्या जाणार आहेत.
सभेचे अध्यक्ष महामंडलेश्वर जनार्धन महाराज यांनी यंदाच्या सप्ताहाचे वैभव आणि दिव्यता अधोरेखित करत महाराष्ट्रातील विद्वत रत्न चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृतमय वाणीचे लाभार्थी होण्याची संधी सर्वांना मिळणार असल्याचे सांगितले. तसेच ऍड. जयवंत महाराज बोधले, महंत रामगिरी महाराज, गुरुवर्य संदीपन महाराज शिंदे यांसह अनेक नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकारांच्या उपस्थितीने सप्ताह अधिक प्रभावी होणार आहे.
या नियोजन बैठकीला आमदार अमोल जावळे, धनंजय चौधरी, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, भागवत विश्वनाथ पाटील, भरत महाराज चौधरी, दुर्गादास महाराज नेहते, भाऊराव महाराज, उद्धव महाराज जुणारे, महंत नितीन महाराज अहिर, विनायक हरणे, राजू राणे, दीपक चौधरी, मारोती परदेशी, घनश्याम पाटील, अतुल तळेले, विजय महाजन, रमेश महाजन, वसंत बोन्डे, मिलिंद वायकोडे, सरपंच पुष्कर फेगडे, नकुल पाटील, मुकेश पाटील, उमाकांत मावळे, अनिल नारखेडे, दूध संघ संचालक नितीन चौधरी, धनंजय फिरके, मुरलीधर इंगळे यांची उपस्थिती होती. अनेक भाविकांनी देणगी जाहीर करून आयोजनाला आर्थिक हातभार लावला आणि बैठकीत उत्साह अधिक वाढविला.
यावेळी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या डाळिंबी (रवींद्र सरोदे) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बैठक शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरेंद्र नारखेडे यांनी केले.



