अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनाने निधन

 

 

नागपूर,   लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी मध्यरात्री वीरा साथीदार यांनी अखेरचा श्वास घेतला. 

 

वर्धा जिल्ह्यातील एका खेड्यात अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या वीरा यांनी त्यांचे आयुष्य संघर्षात घालविले. नागपूरला कामासाठी आलेल्या वीरा यांचे नाते आंबेडकरी चळवळीशी जुळले. शेकडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. बंडखोर कार्यकर्ता म्हणून त्यांचे व्यक्तित्व होते. चैतन्य ताम्हाणे यांच्या कोर्ट या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पोहचला होता. यानंतरही चळवळीशी संबंधित चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे.  त्यांच्या अचानक निधनाने चळवळीचा विद्रोही आणि लढाऊ कार्यकर्ता हरवल्याची शोक भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि आप्तपरिवार आहे.

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदार यांच्यावर पगडा होता. ते स्वत: गीतकार, पत्रकार होते. आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही त्यांनी गायली होती. विविध ठिकाणी ते मार्गदर्शनपर व्याख्याने द्यायचे. पुढे पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला. ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते.

 

62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली होती. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान मिळाला होता. न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले होता. या सिनेमात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका त्यांनी साकारली होती.

Protected Content