बेकायदेशीररित्या सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एकावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील राजकमल टॉकीज जवळील भावना किराणा दुकानासमोरून दुचाकीने अवैधरित्या सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एकावर मंगळवारी ३० जानेवारी रेाजी दुपारी १२ वाजता अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत एकुण ४६ हजार ६२० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राजकमल टॉकीज जवळील भावना किराणा दुकानासमोर एकजण दुचाकी क्रमांक (एमएच १९ एडब्ल्यू ८०४७) वरून बेकायदेशीररित्या सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाला. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद पाटील यांनी शनीपेठ पोलीसांच्या मदतीने कारवाई करत दुचाकीधारकाची चौकशी केली असता त्याने राजेश गुरुमुख दास रामचंदानी (वय-४७) रा. सिंधी कॉलनी जळगाव असे नाव सांगितले. त्याच्याजवळ असलेल्या पिशवीतून एक पाकीट काढले असता त्यामध्ये सुगंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू आढळून आले. दरम्यान अन्न व औषध प्रशासन व शनीपेठ पोलिसांनी कारवाई करत त्याच्याजवळ असलेला २६ हजार ६२० रुपये किमतीचे सुगंधित पान मसाला व तंबाखू आणि २० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ४६ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेश गुरुमुखदास रामचंदानी याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.कॉ. योगेश माळी हे करीत आहे.

Protected Content