जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाईसाठी गेलेल्या तालुका पोलिसांना पाहताच डंपर जागेवर सोडून चालकाने पळ काढल्याची घटना शुक्रवारी १९ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता घडली आहे. यावेळी पोलिसांनी डंपरसह दीड ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी शनिवारी २० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता अज्ञात चालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात विनापरवाना वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार शुक्रवारी १९ एप्रिल रेाजी रात्री ११.३० वाजता तालुका पोलिस पथक कोल्हे हिल्स येथे पोहचले असता एक डंपर वाळू वाहतूक करताना दिसून आला. दरम्यान, पोलीसांना पाहून चालकाने डंपर जागेवर सोडून पसार झाला. यावेळी पोलीसांनी वाळूने भरलेला डंपर ताब्यात घेतला आहे. त्यावेळी पोलिसांनी डंपर व दीड ब्रास वाळू असा एकूण ३ लाख ४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस नाईक उमेश ठाकूर यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शनिवारी २० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहेत.