जळगाव प्रतिनिधी । शहरात खासगी रुग्णालय, सिव्हीलमध्ये जन्मलेल्या बालकांची माहिती रुग्णालयांकडून चुकीची येत असल्याने महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात तशीच नोंद होता आहे.त्यामुळे अशी चुकीची माहिती देणाऱ्या रुग्णालयांवर महापालिकेतर्फे कडक कारवाई करणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी दिली आहे.
महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नागरिक जेव्हा जन्म किंंवा मृत्यूचा दाखला घेण्यासाठी विभागात येतो, तेव्हा दाखल्यातील चुकीची माहिती बघून त्यांना धक्काच बसतो. यावेळी नातेवाईक जन्म-मृत्यू विभागात बदल करण्याची मागणी करतात. परंतू, जन्म-मृत्यू कायद्यानुसार त्यात बदल करता येत नसल्याने बदल करण्यासाठी त्यांना न्यायालयात जावे लागते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या चुकीचा नाहक आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. रुग्णालयाकडून ज्या नोंदी येतात त्या आहे तशाच स्थितीत महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात त्याची नोंद करण्यात येते. बऱ्याच वेळा रुग्णालयाकडून बाळाचे नाव, त्याच्या वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्म ठिकाण यामध्ये चुका केलेल्या असतात. त्यानुसारच एकदा नोंद करण्यात आल्यावर जन्म-मृत्यू कायद्यानुसार त्यात कोणताही बदल करता येत नाही. याचा भविष्यात त्रास होतो. काही बदल करण्यासाठी न्यायालयात जावे लागते. याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागतो. जर डॉक्टरांनी परिपूर्ण माहिती दिली नाही तर नोंदीत होणाऱ्या चुकीसाठी न्यायालयात जावे लागले तर त्याचा खर्च संबधित डॉक्टरांकडून वसूल करण्यात येईल असे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी माहिती दिली.