भुसावळ प्रतिनिधी । कोरोनावर उपयुक्त ठरत असल्याचा दावा करणार्या भुसावळातील युनानी काढ्याच्या युनिटवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.
याबाबत वृत्त असे की, कोरोनाच्या उपचारात रोग प्रतिकारक शक्ती हा महत्वाचा घटक आहे. मालेगाव येथील काढा कोरोनाच्या काळात प्रसिध्द झालेला आहे. या अनुषंगाने भुसावळातील भाजपचे गटनेते मुन्ना इब्राहिम तेली यांनी भुसावळातही या काढ्याची निर्मिती सुरू केली होती. यात नऊ युनानी घटकांचा समावेश असून याच्या मुळे रोग प्रतिकार शक्ती वाढत असल्याचा दावा करण्यात आला होता.
मुन्ना तेली यांनी आपण ना नफा-ना तोटा या तत्वावर हे प्रॉडक्ट उपलब्ध करून देत असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. महाराष्ट्रासह एमपी व गुजरातमध्ये याची लोकप्रियता वाढीस लागली होती. या पार्श्वभूमिवर आज अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने हा काढा तयार करणार्या युनिटवर छापा टाकून सामग्री जप्त केली आहे. धुळे येथील निरिक्षक तथा जळगावचे प्रभारी सहाय्यक आयुक्त शाम नारायण साळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला.
आठ दिवसांपूर्वी या काढ्याबाबत आपल्याकडे तक्रारी आल्या असल्याने येथे कारवाई करण्यात आल्याची माहिती साळे यांनी दिली.