जळगाव प्रतिनिधी । कांचन नगरातील जुना आसोदा रोडवर अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर शनीपेठ पोलीसांनी आज सकाळी छापा टाकून एकाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील १ हजार ३०० रूपये किंमतीची दारू हस्तगत करण्यात आली असून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुना आसोदा रोडवरील एका इमारतीच्या बाजूला गावठी हातभट्टीची दारूची विक्री होत असल्याची माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांना मिळाली. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, पोहेकॉ परिस जाधव, पोलीस नाईक अभिजित सैंदाणे, पो.कॉ. मुकुंद गंगावणे यांनी आज बुधवारी सकाळी ११ वाजता जुना आसोदा रोडवर छापा टाकला. या कारवाईत संशयित आरोपी नरेंद्र अनिल पाटील रा. जुना खेडी रोड योगेश्वर नगर याला अटक केली. त्यांच्या ताब्यातील १ हजार ३०० रूपये किंमतीची ३५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल राहूल घेटे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.