जळगाव प्रतिनिधी । शहरातील चोपडा मार्केटमधील भारद्वाज ट्रेडर्सच्या रिकाम्या खोली बेकायदेशीर विदेशी बनावटीच्या व कालबाह्य असलेल्या सिगारेटची विक्री करणाऱ्या सहा जणांना कारवाई करत ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन बसस्थानक परिसरातील जयकिसनवाडीजवळ असलेल्या भारद्वाज ट्रेडर्स नावाच्या दुकानाच्या शेजारी रिकाम्या खोलीत काही जण बेकायदेशीर बनावट विदेशी व कालबाह्य झालेल्या सिगरेटची विक्री होत असल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, पोहेकॉ मनोज पवार, पो.ना. महेंद्र बागुल, पो.ना. प्रशांत पाठक, पोकॉ विकास पहूरकर आणि पो.कॉ. विनोद पाटील यांनी आज बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास छापा टाकून उपस्थित असलेले नरेंद्र भागवत पाटील (वय-३२), एकनाथ श्रीराम पाटील (वय-२४) दोन्ही रा. आव्हाणे ता. धरणगाव, ललित विलास पांडे (वय-४५) रा. गांधी नगर, जिल्हा पेठ, जयवंत मधुकर बाविस्कर रा. चांदसर ता. धरणगाव, प्रेमसिंग नंदसिंग पाटील (वय-२६) रा. दादावाडी जैन मंदीराच्या मागे आणि भारद्वाज ट्रेडर्सचे मालक अरूण पुंडलिक पाटील यांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातील विदेशी बनावटी आणि एक्सपायर झालेले सिगारेट असा एकुण २९ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोहेकॉ मनोज पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप चांदेलकर करीत आहे.