अंबाजोगाईमध्येही ऑक्सिजनचा अभाव, 5 रुग्णांचा मृत्यू

 

 

बीड : वृत्तसंस्था । नाशिकनंतर आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुद्धा ऑक्सिजनअभावी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसा आरोप मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी केला आहे.

 

रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे झाला नसल्याचे रुग्णालयाचे डीन शिवाजी शुक्रे यांनी सांगितलं आहे.

 

राज्यात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. रोज हजारो रुग्ण आढळत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातवरण आहे. आज ऑक्सिजन अभावी नाशिकमध्ये  22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राज्य सुन्न झालेलं असताना आता अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिनच्या तुटवड्यामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहेत.

 

नाशिकची धटना ताजी असताना अंबाजोगाई येथेसुद्धा रुग्णांचा  मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचे आरोप झाल्यानंंतर पुन्हा मोठी खळबळ उडाली. ऑक्सिजन कमतरता होती तर रुग्णालय प्रशासनाने आधीच खबरदारी का घेतली नाही, असे आरोप होऊ लागले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. सध्या आमच्याकडे रुग्णांसाठी लागणारा आवश्यक तो ऑक्सिजनचा पुरवठा आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

 

दिवसभरात उपचार करताना एकूण 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.  आज मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांचे वय  60 वर्षे आहे. यामध्ये बहुतांश रुग्ण हे शारीरिक व्याधी किंवा रक्तदाब, हायपरटेन्शन असलेले रुग्ण आहेत, असंसुद्धा त्यांनी सांगितलं.

 

दरम्यान, नाशिकची घटना ताजी असताना अंबाजोगाई येथेसुद्धा ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णांचे वाढते प्रमाण आणि ऑक्सिजनचा भासणारा तुटवडा हा चिंताजनक असल्याचं म्हटलं जातंय.

 

Protected Content