जळगाव प्रतिनिधी । कोरोना आजाराच्या मृतांच्या विल्हेवाटीसाठी नेरी नाका स्मशानभूमी येथे 4 ओटे राखीव ठेवलेले असल्याने जळगाव औद्योगिक क्षेत्रातील स्माशनभूमीकरीता अधिग्रहीत करण्यात आलेली जागा अधिग्रहणातून मुक्त करण्यास हरकत नसल्याचे अभिप्राय सहाय्यक आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांनी दिलेले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जळगाव येथील सेक्टर के मधील ओपन स्पेसचे क्षेत्र 1500 चौमी या जागेचे स्मशानभूमीकरीता करण्यात आलेले अधिग्रहण रद्द करण्याचे आदेश अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.
शासनाकडून ऑक्सिजन प्रकल्पासाठी महामंडळाचे औद्योगिक क्षेत्रात सवलतीच्या दरामध्ये भूखंड देण्याबाबत आदेशित केलेले असल्याने आयुक्त शहर महानगरपालिका यांनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या जागेच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेल्या स्मशानभूमीकरीता उपलब्ध असलेली साधनसामुग्री महानगरपालिकेच्या इतर स्मशानभूमीमध्ये तात्काळ स्थलांतरित करुन हे क्षेत्र व्यवस्थापक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जळगाव यांचे ताब्यात तात्काळ देण्याची कार्यवाही करावी. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी या आदेशात म्हटले आहे.