यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । सहा वर्षीय बालिकेला केळी खावू घालण्याचे अमिष दाखवित तिच्यावर अत्याचार करणाऱ्या रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (वय २०, रा. जामुनझिरा ता. यावल) या नराधमाला दोषी ठरवित त्याला २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. हा निकाल भुसावळ विशेष न्यायालयाने दिला आहे.
यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सप्टेंबर २०२० रोजी सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेला केळी खाण्यास देण्याचे अमिष दाखवित तिला घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला याच्याविरुद्ध पोस्कोतंर्गत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला भुसावळ विशेष न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये सरकारपक्षाकडून अकरा साक्षीदार तपासण्यात आले. तसेच सरकारी वकील ॲड. मोहन देशपांडेयांनी प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत रोहनसिंग बारेला याला दोषी ठरविले. सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.
पैरवी अधिकारी म्हणून भिमदास हिरे यांनी तर केस वॉच म्हणून पीसी अनिल पाटील ऐजाज गवळी यांनी मदत केली. आरोपी रोशनसिंग बारेला याला भादवि ३६३ अन्वये ७ वर्ष सक्त मजूरी व ५०० रु पये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, भादवि कलम ३७६(१), ३७६ (२), (एफ)(आय) तसेच पोक्सो कायदा कलम ४ व ६ अन्वये २० वर्ष सक्तमजूरी व पाचशे रुपये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, कलम ३५४ (अ) व पोक्सो कायदा कलम ८ व १२ अन्वये ३ वर्ष कैद व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही सर्व शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाची असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. भुसावळ न्यायालयात पोक्सो कायद्यांतर्गत पहिल्यांदाच आरोपीला २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.