तमिळनाडू, वृत्तसंस्था । राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी ए.जी.पेरारीवल याची ३० दिवसांसाठीची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. या आरोपीच्या आईच्या विनंतीवरुन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी ही सुट्टी मंजूर केली आहे.
आरोपी पेरारीवलन याच्या आईने सध्याच्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांना पत्र लिहित ही सुट्टी मंजूर करण्याची विनंती केली होती. पेरारीवलन करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्यांच्या गटात मोडत असल्याचं कारागृहातल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर पेरारीवलनचे उपचार अद्यापही पूर्ण झाले नसल्याने त्याला उपचाराची गरज असल्याच्या कारणावरुन त्याच्या आईने या सुट्टीची मागणी केली होती.
मागच्या वेळच्या त्याच्या सुट्टीमध्ये त्याला उपचार मिळू शकले नाहीत. कारण, करोना प्रादुर्भावामुळे हॉस्पिटलचे सर्व वॉर्ड्स करोना वॉर्डमध्ये रुपांतरीत कऱण्यात आले होते.
त्याचबरोबर पेरारीवलनची आई, अर्पूथम्मल यांनी आपल्या पत्रामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांची संख्या कमी करण्याबद्दलही सुचवलं आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी सुट्टीवर गेलेल्या कैद्यांनाही सुट्टी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सुट्टीला मंजुरी मिळाल्यानंतर त्या म्हणाल्या, आईच्या भावना आणि पेरारीवलनचं आरोग्य या दोन गोष्टी लक्षात घेऊन मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सुट्टी मंजुर केली त्यामुळे मी त्यांचे आभार मानते.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात पेरारीवलन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्या सुटकेसाठीची तमिळनाडू सरकारची मागणी अद्यापही मान्य झालेली नाही. पेरारीवलन ३० वर्षांहून अधिक काळ कैदेत आहे.