जामनेरात मेडिकल व नर्सिंग कॉलेजला मान्यता

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पळसखेडा येथील जैन नॉलेज सिटी या शैक्षणिक संकुलात श्री प्रकाशचंद जैन फिजिओथेरपी मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज या दोन्ही नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे.

प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत 2010 पासून जैन इंटरनॅशनल सीबीएससी स्कूलला सुरुवात झाली. यानंतर 18 एकर एवढ्या भव्य निसर्गरम्य परिसरात 2015 पासून बी.एड कॉलेज, आयटीआय तसेच 2018 पासून डी. फार्मसी व बी. फार्मसी कॉलेज शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहेत. काही महिन्या अगोदर श्री. प्रकाशचंद जैन फिजिओथेरपी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च व श्री. प्रकाशचंद जैन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या नवीन अभ्यासक्रमांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला होता. त्यामुळे मंडळाच्या तज्ञ समीतिकडून या दोन्ही अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयाची निरीक्षण व तपासणी करण्यात आली.

तपासणीच्या वेळी प्रशस्त इमारत, अद्यावत व सुसज्ज प्रयोगशाळा, तज्ञ प्राध्यापक निसर्गरम्य परिसर, थम मशीनद्वारे प्राध्यापक, कर्मचारी, परिचारिका या सर्वांच्या घेतल्या जाणाऱ्या नोंदी, डिजिटल क्लासरूम, पेशंटची व्यवस्था व नियमित घेतली जाणारी काळजी या सर्व उपलब्ध सुविधांच्या आधारे संस्थेने शासनाचे सर्व मानांकन पूर्ण केल्यामुळे तज्ञ समितीने समाधान व्यक्त केले व ज्यांच्या अथक परिश्रमातून सदर संस्था नावारुपास आली असे संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडीया व सचिव मनोजकुमार कावडीया यांचे या शैक्षणिक कार्याबद्दल अभिनंदन सुद्धा केले.

हे दोन्हीही अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमामुळे तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील व राज्यातील गरजू विद्यार्थ्यांनी फिजिओथेरपी मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेजला प्रवेश घेऊन आपले भवितव्य घडविण्यासाठी संस्थेने संधी उपलब्ध करून दिलेली आहे. याच शैक्षणिक संकुलनात प्रकाशचंद जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व श्री प्रकाशचंद जैन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज तसेच आईशकुंतलाजैन फार्मसी महाविद्यालय (डी.फार्मसी व बी.फार्मसी) या नवीन अभ्यासक्रमांना सुद्धा लवकरच मान्यता मिळणार आहे असे संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडिया यांनी सांगितले.

 

 

Protected Content