‘एक्झीट पोल’नुसार जळगाव व रावेरमधून भाजपलाच मिळणार कौल !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज जाहीर करण्यात आलेल्या दोन एक्झीट पोलमधून जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची सरशी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर विविध एक्झीट पोल्स समोर आले आहेत. यात टिव्ही नाईन या वाहिनीसह एबीपी-सी व्होटरचे अंदाज जाहीर करण्यात आलेले आहेत. यानुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तारूढ होणार असल्याचे बहुतांश एक्झीट पोल्सने अधोरेखीत केले आहे. यात भाजपला काही राज्यांमध्ये फटका बसणार असला तरी काही राज्यांमध्ये ही भर निघणार असल्याचे नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मध्ये अतिशय जोरदार टक्कर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. बहुतांश एक्झीट पोल्सचा विचार केला असता महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार टक्कर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात सांगली येथील जागा अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर उर्वरित जागांमध्ये महायुतीला २३ तर महाविकास आघाडीला २४ जागा मिळणार असल्याचे सुचविण्यात आले आहे.

दरम्यान, या एक्झीट पोलमध्ये जळगावमधून भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ तर रावेरमधून भाजपच्याच रक्षाताई खडसे या विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरं तर दोन्ही जागांवर अतिशय चुरशीची लढत झाली असल्याचे दिसून आले होते. तथापि, एक्झीट पोलमध्ये मात्र भाजपलाच कौल मिळणार असल्याचे सुचीत करण्यात आले आहे. अर्थात, हा केवळ अंदाज असून नेमका निकाल हा ४ जून रोजी दुपारपर्यंत लागणार आहे.

Protected Content