नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदार संघातून रिंगणात उतरणार आहेत. यावरुन केरळचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीएमचे ज्येष्ठ नेते व्ही.एस.अच्युतानंदन यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख ‘अमूल बेबी’ असा केला आहे. त्याचवेळी ‘देशाभिमानी’ या सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे ‘पप्पू स्ट्राइक’ असल्याचे म्हटले आहे.
अच्युतानंदन यांनी फेसबुक पोस्ट लिहून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी राजकारणात बालिशपणा दाखविला आहे, त्यामुळे त्यांना तेव्हा (२०११) ‘अमूल बेबी’ म्हणालो होतो. त्यांनी वायनाड मतदार संघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन आता ते सिद्ध झाल्याचे समजते, असेही त्यांनी म्हटले आहे.काँग्रेस अध्यक्षांचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात पुकारलेली लढाई असल्याची टीका सीपीएमने केली आहे.