अजित पवार गटाच्या आमदाराचे स्वीय सहायकांचा अपघाती मृत्यू

भिवंडी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे पीए प्रशांत सुरेश भोईर यांचा अपघात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजणोली गावात ५ मे रोजी रविवारी रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत प्रशांत हे वांशिदमध्ये कुटूंबासह राहून शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे खासगी पीए म्हणून कार्यरत होते. रविवारी मध्यरात्री तक्रारदार रविंद्र गणपत मडके (वय 38 रा.)चेरपोली शहापूर हे मित्रांसह कारमधून दारू पिण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत एका बारमध्ये आले होते. त्यावेळी मयत प्रशांत हा दोन मित्रांसह दुसऱ्या कारमधून त्याच बारमध्ये दारू पिण्यासाठी आला.

बार बंद झाल्याने तक्रारदार रविंद्र मडके व त्यांच्यासोबतचे मित्र आणि प्रशांतसह त्याच्यासोबत असलेले मित्रही बार बंद झाल्याने घरी जाण्यास निघाले. पण, प्रशांत ज्या कारमधून आला होता, त्या कारचालक मित्राने तक्रारदार रविंद्र यांना मोबाईलवर संपर्क करून सांगितले कि, प्रशांत आमच्या कारमध्ये नाही तुम्ही येताना त्याला कार मधून घेऊन या. त्यामुळे, मडके यांनी कार पुन्हा बार कडे वळवून आणली असता, मुंबई नाशिक महामार्गावरील स्वागत बार समोर प्रशांत गंभीर जखमी अवस्थेत पडून होता. ही घटना पाहताच दोन्ही कारमधील मित्रांनी जखमी प्रशांत यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने कार्डिओ रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरने तपासून मृत घोषित केल्याने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. मात्र, प्रशांत यांचा नेमकं अपघात कसा झाला, हे गूढ कायम असून या घटनेनंतर संशय व्यक्त होत आहे. त्यानुसार, पोलीस तपास करत आहेत.

Protected Content