बुरहाणपूर-अंकलेश्वर रस्त्यांच्या पुलावर अपघाताचा धोका; संरक्षण कठडे लावण्याची मागणी


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या, नेहमी वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या बुरहाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर किनगावपासून चोपडा दिशेला जाणाऱ्या पुलावर मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कारण, या पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षण कठडे नसल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

किनगाव ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या या पुलावर पूर्व-पश्चिम दोन्ही बाजूंना कठडे अपूर्ण अवस्थेत आहेत. पुलाचे बांधकाम पूर्ण असले तरी, पुलाच्या सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत 10 ते 15 फुटांपर्यंत संरक्षण कठडे बांधले गेलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालक ज्या ठिकाणी पुलाची सुरुवात होते, तिथूनच थेट खोल नाल्यात (15-20 फूट) पडण्याचा धोका आहे. या महामार्गावर दररोज हजारो वाहने धावतात. जवळच असलेल्या यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे वाहतूक अधिकच वाढलेली आहे. शेकडो केळी वाहतूक करणारी वाहने, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, खाजगी चारचाकी, दुचाकी वाहनांची येथे सतत वर्दळ असते.

पूर्वी पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर झाडे होती, जी काही प्रमाणात सुरक्षा पुरवायची. मात्र, ती झाडे तोडल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजू पूर्णपणे उघड्या झाल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना कठडे नसलेल्या भागातून वाहने चालवावी लागतात. वाहनावर थोडासा ताबा सुटला तरी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालकांनी जोरदार मागणी केली आहे की, पुलाच्या दोन्ही बाजूंना 10-15 फुटांपर्यंत मजबूत संरक्षण कठडे त्वरित बांधण्यात यावेत. त्यामुळे भविष्यातील संभाव्य अपघात टाळता येतील आणि नागरिकांचे प्राण सुरक्षित राहतील.